Dasara Melava 2023 : राज्यात मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्कात दसरा मेळावा (Dasara Melava 2023) कोण घेणार ? यावरून राजकारण सुरु झाले होते. मात्र या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे.
शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) दोघांनीही शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास आग्रह धरला होता. आता मात्र शिंदे गटानं एक पाऊल मागे घेत, यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेणार असल्याचं घोषित केलं.
बाळासाहेब ठाकरे यांनी 30 ऑक्टोबर 1966 रोजी दसरा मेळाव्याची (Shivsena Dasara Melava) मुहूर्तमेढ रोवली होती. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. दोन शिवसेना आहेत आणि दोन दसरा मेळावेही.
दरम्यान, यंदाच्या वर्षी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गेल्या वर्षीप्रमाणं बाळासाहेबांची खुर्ची मंचावर ठेवली जाणार आहे. याच खुर्चीवरून बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यात 2012 साली शेवटचे भाषण केले होते.
ती खुर्ची आठवण म्हणून ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी एमएमआरडीए मैदानात झालेल्या दसरा मेळाव्यात हीच खुर्ची ठेवण्यात आली होती.
याही वर्षी बाळासाहेबांची आठवण म्हणून ही खुर्ची ठेवली जाणार आहे. त्या माध्यमातून शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे याच खुर्चीत बसून बाळासाहेब ठाकरे यांनी “माझ्या उद्धवला सांभाळा…’ असे भावनिक आवाहन शिवसैनिकांकडे केले होते.