IAF First air Marshal Couple: जगातील सर्वात प्रतिष्ठित हवाई दलांपैकी एक असलेल्या भारतीय हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच एक जोडपे एअर मार्शलचे प्रतिष्ठित पद सांभाळत असल्याचे आढळून आले आहे. भारतीय हवाई सेवेतील लढाऊ पायलट (निवृत्त) केपी नायर आणि त्यांची पत्नी साधना सक्सेना नायर अशी त्यांची नावे आहेत.
केपी नायर 2015 मध्ये निवृत्त झाले. तेव्हा ते फ्लाइट सेफ्टी (निरीक्षण) महासंचालक पदावर होते. त्यानंतर सोमवारी (23 ऑक्टोबर) त्यांची पत्नी साधना यांना सशस्त्र दलाचे प्रभारी महासंचालक (रुग्णालय सेवा) या पदावर बढती देण्यात आली आहे. यासह नायर दाम्पत्य भारतीय हवाई दलातील पहिले आणि एकमेव एअर मार्शल जोडपे ठरले आहे.
इतिहासात प्रथमच एअर मार्शल पदावर बढती –
भारतीय वायुसेनेच्या इतिहासात व्हाइस एअर मार्शल पदावरून एअर मार्शल पदावर पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. एअर मार्शल पदापर्यंत पोहोचणाऱ्या साधना या हवाई दलातील दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. पहिल्या महिला एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय होत्या ज्या आता निवृत्त झाल्या आहेत.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एअर मार्शल साधना नायर यांची एअर फोर्स हेडक्वार्टर ट्रेनिंग कमांड, बेंगळुरू येथून बदली करण्यात आली असून त्यांना येथे बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर त्यांची मुख्यालयात बदली झाली आहे.
हवाई दलात तीन पिढ्या –
एअर मार्शल साधना या भारतीय वायुसेनेच्या डॉक्टरांची मुलगी आणि बहीणही आहेच. त्यांचा मुलगाही हवाई दलाचा फायटर पायलट आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन पिढ्या गेल्या 70 वर्षांपासून हवाई दलात कार्यरत आहेत. त्यांचे वडील आणि भाऊही भारतीय हवाई दलात डॉक्टर होते. पुण्याच्या एएफएमसी कॉलेजमधून एमबीबीएस केलेल्या साधना डिसेंबर 1985 मध्ये हवाई दलात दाखल झाल्या. त्यांनी नवी दिल्ली एम्समध्ये 2 वर्षांचे प्रशिक्षणही घेतले आहे.