शरीफ यांचा दोन देशांच्या मदतीने सुटकेचा खटाटोप

इम्रान खान यांचा गौप्यस्फोट

इस्लामाबाद -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरूंगात असणारे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या संदर्भात एक गौप्यस्फोट केला. शरीफ यांनी दोन मित्रदेशांच्या मदतीने सुटकेसाठी खटाटोप केल्याचा दावा इम्रान यांनी केला.

येथे पत्रकारांशी बोलताना इम्रान यांनी वरील गौप्यस्फोट केला. मात्र, शरीफ यांनी मदतीसाठी साकडे घातलेल्या देशांची नावे उघड करण्याचे त्यांनी टाळले. शरीफ यांच्या सुटकेसंबंधीचा संदेश दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी मला दिला. पण, त्यांनी कुठला आग्रह धरला नाही. शरीफ यांच्या सुटकेविषयी हस्तक्षेप करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे इम्रान यांनी म्हटले. शरीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे तीन खटले दाखल होते. त्यातील एका खटल्यात पाकिस्तानमधील न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत सात वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली.

त्यानंतर 69 वर्षीय शरीफ यांना लाहोरमधील कोट लखपत तुरूंगात ठेवण्यात आले आहे. तुरूंगात असतानाही त्यांनी सुटका व्हावी यासाठी कशाप्रकारे हालचाली केल्या, ते समजू शकलेले नाही. शरीफ आणि त्यांच्या कुटूंबीयांनी भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. ते आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा प्रत्यारोप त्यांच्याकडून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.