कोल्हापूर – वंचित बहुजन आघाडीने उद्धव ठाकरेंसोबत युती केली. मात्र वंचितचा समावेश महाविकास आघाडीत अद्याप तरी झालेला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आता याबाबत भाष्य केले आहे. शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हंटले आहे. तसेच आघाडीत येण्याबाबत आंबेडकर यांचा प्रस्तावही आला नसल्याचे पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तुमच्यावरून ठाकरे गट आणि आंबेडकर यांच्यात वाद असल्याच्या चर्चा आहेत त्यावर तुम्हाला काय वाटत असा सवाल पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या दोघांमध्ये वाद आहे की नाही हे मला माहित नसल्याचे पवार म्हणाले.
वंचित आणि ठाकरे गटाच्या चर्चेत आम्ही कुठेच नव्हतो. आमच्यात झालेल्या चर्चा महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्रित निवडणुकीला समोर जाण्याबाबत होत्या आणि तो प्रयत्नही आम्ही सुरु ठेवला असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले. तसेच महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे पुढे जाण्याची स्पष्टता असल्याचे देखील पवारांनी यावेळी स्पष्ट केले.