राजगुरूनगर -केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला दिल्याचा चुकीचा निर्णय दिल्याप्रकरणी खेड तालुका शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने बुधवारी (दि.22) राजगुरूनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत निषेध करण्यात आला.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मान्य नाही. शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा राजगुरूनगर येथे आंदोलन करीत तीव्र निषेध करण्यात आला. पुणे नाशिक महामार्ग काही मिनिटे रोखत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच बेताल वक्तव्य केले या वक्तव्याचाही यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.
या आंदोलनात उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबाजी काळे, खेड तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख सुरेश चव्हाण, बाळासाहेब ताये, किरण गवारे यांच्यासह मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.