पिंपरी – बालाजीनगर चौक, भोसरी येथे एका टोळक्याने तलवारीने केक कापत वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दोन आठवड्यांनी संबंधित सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्नील पोटभरे, महेंद्र सरवदे, सलीम शेख, अभिषेक देवकर (सर्व रा. बालाजीनगर, भोसरी) आणि अन्य 2 ते 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई विशाल काळे यांनी रविवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तलवारीने केक कापण्याची घटना 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास बालाजीनगर चौक, टेल्को रोड, भोसरी येथे घडली. आरोपीचा वाढदिवस असल्याने त्यांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापून त्याचे प्रदर्शन केले. सोशल मीडियावर या वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.
दरम्यान माजी पोलीस आयुक्त आर. के. पदम्नाभन यांनी रस्त्यावर वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हा प्रकार बंद झाला होता. महापालिकेच्या निवडणूका जवळ येऊन लागल्याने इच्छुक राजकीय नेते मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास फटाके फोडत, घोषणाबाजी करीत मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे करीत आपले शक्तीप्रदर्शन करीत आहेत.