गंभीर परिस्थिती! रक्‍ताचा तुटवडा, प्लाझ्मासाठी वणवण

करोनामुळे परिस्थिती गंभीर : शस्त्रक्रियेमध्ये येताहेत अडचणी

पिंपरी – शहरातील विविध रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळण्यात नेहमी अडचणी येतात. परंतु, सध्या पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळण्यातही अडचणी येत आहेत. त्यातही “ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाचा सर्वाधिक तुटवडा आहे. शहरातील काही रक्तपेढ्यांमध्ये सध्या केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. तर, काही ठिकाणी प्रत्येक रक्तगटाच्या केवळ तीन ते चार बॅगाच उपलब्ध आहेत. त्याशिवाय, कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या प्लाझ्मासाठी देखील रुग्णाच्या नातेवाइकांना प्लाझ्मा दाता शोधून आणावा लागत आहे.

निगेटिव्ह रक्तगटाबरोबर सध्या पॉझिटिव्ह रक्तगटाचाही तुटवडा जाणवत आहे. त्यातही सर्वाधिक “ए’ पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळण्यात अडचणी येत आहेत. प्लाझ्मा दात्यांची यादी उपलब्ध नसल्याने ज्या रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे त्यांच्या नातेवाईकांना स्वत: प्लाझ्मा दाते घेऊन यावे लागत आहे. त्यानंतर ही गरज भागवणे शक्‍य होत आहे. रक्तदान शिबिर होत असले तरी रक्तदान करण्यासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यल्प आहे.
– दीपक पाटील, प्रमुख, पिंपरी सिरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड बॅंक, खराळवाडी.

सध्या प्रत्येक रक्तगटाच्या 3 ते 4 बॅग उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या रुग्णाला रक्ताची गरज आहे, त्याच्या नातेवाईकांनी रक्तदान केल्यानंतरच रुग्णाला रक्त उपलब्ध करून देणे शक्‍य होत आहे. कोविडच्या रुग्णांसाठी प्लाझ्मा दाते मिळाल्यानंतर त्यांना प्लाझ्मा देता येत आहे. रक्तदान शिबिरांसाठी स्वयंसेवी संस्था, सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
– निलेश गायकवाड, मोरया ब्लड बॅंक.

प्लाझ्माची परिस्थिती गंभीर
कोविड रुग्णांना देण्यात येणाऱ्या प्लाझ्माची परिस्थिती तुलनेत गंभीर आहे. मागणीच्या तुलनेत होणारा पुरवठा खुपच अत्यल्प आहे. रक्तपेढ्यांकडे प्लाझ्मा दात्यांची यादी उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना त्यांच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र परिवार किंवा “प्लाझ्मा दाता’ शोधून ही गरज भागवावी लागत आहे. काही रक्तपेढ्यांना प्लाझ्मा दाते मिळत आहेत मात्र ते देखील खूपच अत्यल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी प्लाझ्मा दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.