आजपासून वीकेंड लॉकडाऊन; दोन दिवस कडक बंदोबस्त

परीक्षांना जाण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी

पुणे – राज्य सरकार तसेच पुणे महापालिकेने 5 मार्च रोजी काढलेल्या सुधारित आदेशानुसार शुक्रवारी सायंकाळी 6 पासून दोन दिवसांचा कडकडीत वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. यामधून अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध (संचारबंदी) करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणाही वीकेंड लॉकडाऊनसाठी सज्ज झाली आहे.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रात सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी सहा या वेळेत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. पोलिसांनी 144 प्रमाणे जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. जमावबंदीच्या आदेशाचे पोलीस काटेखोरपणे पालन करत आहेत. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सहानंतर अत्यावश्‍यक हॉटेल (फक्‍त पार्सल) व मेडिकल वगळता सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे सायंकाळी सहानंतर पोलीस रस्त्यावर बॅरिकेटस लावून बंदोबस्त ठेवत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वीकेंड लॉकडाऊनलाही दोन दिवस कडक बंदोबस्त असणार आहे.

यासंदर्भात पोलीस प्रशासन शुक्रवारी बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांच्या संघटनांनी शुक्रवारी दुकाने उघडण्याचा पावित्रा घेतला आहे. यासंदर्भात अतिरीक्‍त पोलीस आयुक्‍त डॉ. संजय शिंदे यांची व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींबरोबर रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती.

दरम्यान, वेगवेगळ्या परिक्षा व स्पर्धा परिक्षांना जाण्यासाठी विकेंन्ड लॉकडाउन दरम्यानही विद्यार्थ्यांना परवानगी असेल. त्यांच्यासोबत जाणाऱ्या एका पालकासही परवानगी असेल. यासाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाईल. ई कॉमर्स कंपन्यांना आठवड्यातील सातही दिवस 24 तास होम डिलिव्हरीसाठी परवानगी असेल. उत्पादन कंपन्यांच्या कामगारांनाही परवानगी असेल, त्यांना स्वत:चे ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.