61 वर्षांपूर्वी प्रभात: राष्ट्रीय लॉटऱ्या काढाव्या की नाही?

ता. 9, माहे एप्रिल, सन 1960

नवी दिल्ली, ता. 8 – राष्ट्रीय लॉटऱ्या संघटित कराव्या अशा आशयाच्या बिनसरकारी ठरावावर राज्य सभेतील कॉंग्रेस पक्षीय सभासदांत तीव्र मतभेद असल्याचे आढळून आले. दयाळदास कुरी यांच्या ठरावाला विरोध करताना काही सभासदांनी सांगितले की, लॉटऱ्या काढणे गांधीवादाशी विसंगत आहे. आर्थिक प्रश्‍नाबाबत नैतिक विचार चालू युगात चालणार नाही.

उत्पादन वाढीस मुभा देऊनही मोटारींच्या किमती कमी नाही

नवी दिल्ली – “उत्पादन वाढीला परवानगी दिली तरी मोटारच्या कारखानदारांनी मोटारीच्या किमती कमी करू, असे आश्‍वासन दिलेले नाही, असे उद्योग खात्याचे मंत्री मनुभाई शाह यांनी आज लोकसभेत सांगितले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेअखेर सर्व साधारणतः या धंद्यात शक्‍य असते तितकी स्वयंपूर्णतः हे कारखाने गाठतील अशी आशा आहे.

सीमा रक्षणासाठी खास संरक्षण व्यवस्था
नवी दिल्ली – लडाख ते नेफापर्यंतच्या सीमांच्या रक्षणासाठी स्वतंत्र लष्करी आधिपत्य स्थापन करावे असे आज लोकसभेत एका कॉंग्रेस खासदारांनी सांगितले. संरक्षण खात्याच्या मागण्यांवरील
चर्चेत भाषण करताना अजितसिंग सरहद्दी म्हणाले, की सर्व सरहद्दीच्या संरक्षणाची सूत्रे या अधिपत्याकडे द्यावीत.

अवकाशात मनुष्य धाडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
अटलांटा (जार्जिया) – येत्या उन्हाळ्यात अवकाशात मनुष्य धाडण्याचा प्रयत्न अमेरिका करील असे एका सुप्रसिद्ध अमेरिकन वैज्ञानिकाने सांगितले. अवकाशात पाठविण्यात येणारी कॅप्सूल रेडस्टोन किंवा ऍटलास अग्निबाणाने फेकला जाईल. 100 मैल उंचीवर 15000 मैलाच्या वेगाने हा अग्निबाण जाईल, असे
डॉ. हॅगेन यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.