डॉक्टरसह सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन वाकडमधील वेदांता सोसायटीने ऑक्सिजन, डॉक्टरसह प्राथमिक सुविधांनी सुसज्ज असा विलगीकरण कक्ष उभारून एक आदर्श निर्माण केला आहे.
वाकडमधील वेदांता सोसायटीमध्ये 344 सदनिका असून, त्यात सुमारे दोन हजार नागरिक राहतात. करोनाचे संक्रमण सर्वच ठिकाणी होत असल्याने वेदांता सोसायटीही त्यास अपवाद राहिलेली नाही. या सोसायटीमधील सहा जणांना करोनाची बाधा झाली. या रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे सोसायटीच्या आवारातच असलेल्या एका खोलीत विलगीकरण कक्ष उभारण्याचा निर्णय सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.
सध्या विलगीकरण कक्षात बेड, गॅस शेगडी, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजनची सिलिंडर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच वेदांता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ धोंडे तसेच इतर पदाधिकारीही अलगीकरण कक्षात असलेल्या येथील रहिवाशांकडे लक्ष देऊन असतात. सोसायटीतील काही सदस्यांनी स्वतः पुढे येऊन विलगीकरण कक्षात असलेल्या रहिवाशांना जेवणाचा डबा पुरविण्याची तयारी दर्शविली आहे.
सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. करोना बाधित व्यक्तीमुळे अन्य नागरिकांना बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोसायटीच्या आवारातच विलगीकरण कक्ष निर्माण करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यास अन्य सदस्यांनी पाठिंबा दिला. अन्य सोसायट्यांनीही असाच उपक्रम राबविल्यास सोसायटीमधील रुग्णांची सोय होईल.