मुंबई – अर्थसंकल्पात प्राप्तिकर रचनेत कसलाही बदल करण्यात आलेला नाही. भांडवली नफ्यावरील करातही वाढ करण्यात आलेले नाही. केंद्र सरकार पायाभूत सुविधावर प्रचंड गुंतवणूक करणार आहे. या कारणामुळे कालपासून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जोरदार खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे काल शेअर बाजार निर्देशांक पाच टक्क्यांनी वाढले होते. आजही निर्देशांकात अडीज टक्क्यांची भर पडली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2.46 टक्क्यांनी म्हणजे 1,197 अंकांनी वाढून 49,797 अंकावर बंद झाला. काही काळ सेन्सेक्स 50,000अंकांच्या पुढे गेला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 366 अंकांनी वाढून 14,647 अंकांवर बंद झाला.
कालपासून सेन्सेक्समध्ये 7.58 टक्क्यांची म्हणजे 3,511 अंकांची भर पडली आहे. त्याचबरोबर निफ्टीमध्ये 7.38 टक्के म्हणजे 1,007 अंकांची भर पडली आहे. सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 27 कंपन्यांच्या शेअरच्या भावात आज वाढ झाली. गेल्या आठवड्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बरीच गुंतवणूक काढून घेतली होती. मात्र सोमवारी या गुंतवणूकदारांनी 1,494 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे दिसून येते.
गुंतवणूकदारांच्या उत्साहाबद्दल बोलताना काही ब्रोकर्सनी सांगितले कि बऱ्याच गुंतवणूकदारांना कोव्हीड कर लागेल असे वाटत होते. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रासाठी प्राप्तिकरावर एखादा अधिभार लावला जाण्याची शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात अर्थमंत्र्यांनी कर रचनेत कसलाही बदल केलेला नाही. त्यातच जागतिक बाजारातून आज सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांकांना आभार मिळाला.