नवी दिल्ली: कोरोनामुळे दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला असून देशात कोरोनाचा हा दुसरा बळी ठरला आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये कोरोनामुळे मोहम्मद सिद्दीकी या ७६ वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला होता.
यानंतर आता दिल्लीत ६९ वर्षीय महिला कोरोनाची लागण झाल्याने मृत्युमुखी पडली आहे. सदर महिलेवर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच जपान, जिनिव्हा आणि इटलीमधून प्रवास करून घरी परतला होता. या महिलेच्या मुलाकडून तिला कोरोनाची बाधा झाली होती. असं असलं तरी नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना जीवघेण्या कोरोनाची बाधा झालेली नाही.
कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण वृद्धांमध्ये जास्त असल्याचं जगभरामध्ये निदर्शनास आलं असल्याने कुटुंबातील वयोवृद्धांची विशेष काळजी घ्यायला हवी.