Ambani Brothers | अंबानी बंधूंना SEBIचा दणका; ‘त्या’ प्रकरणात 25 कोटींचा दंड

मुंबई  – शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीने (सिक्‍युरिटिज अँड एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांना दोन दशक जुन्या प्रकरणात 25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात अंबानी बंधूंव्यतिरिक्त इतरही काही व्यक्तींचा समावेश आहे.

हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित असून 2000 मधील आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने अधिग्रहण नियमांचे पालन न केल्यामुळे सेबीने ही कारवाई केली आहे. ज्या व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला आहे त्यात अंबानी बंधूंव्यतिरिक्त नीता अंबानी, टीना अंबानी, के डी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. नीता अंबानी या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत, तर टीना अंबानी या अनिल अंबानी यांच्या पत्नी आहेत.

सेबीने आपल्या 85 पानांच्या आदेशात म्हटले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या व्यक्ती 2000 मध्ये कंपनीच्या 5 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक हिश्‍याचे अधिग्रहण करण्याबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. 2005 मध्ये मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात वाटणी होऊन त्यांनी आपले स्वतंत्र उद्योग समूह स्थापन केले होते.

दरम्यान, सेबीच्या आदेशानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांनी 2000 मध्ये रिलायन्सचे 6.83 टक्के शेअर विकत घेतले होते. हे अधिग्रहण करताना त्यांनी 1994 मध्ये बाजारात आणलेल्या 3 कोटींच्या वॉरंटचा वापर केला होता. वॉरंट रुपांतरित करून हे शेअर विकत घेण्यात आले होते.

सेबीच्या म्हणण्यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज प्रवर्तकांनी इतर काही लोकांशी संगनमत करून शेअर विकत घेण्यासंदर्भात कोणताही घोषणा केली नाही. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचेच शेअर विकत घेतल्यावर किंवा कंपनीतील आपली हिस्सेदारी वाढवल्यावर या बाबी जाहीर करणे सेबीच्या नियमानुसार आवश्‍यक आहे. मात्र अंबानी बंधूंनीूं सेबीच्या या नियमांचे उल्लंघन केले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.