डॉ. मेघश्री दळवी
अवकाशातून घेतलेलं पृथ्वीचं पहिलं छायाचित्र, अपोलो यान चंद्राजवळ असताना घेतलेलं अर्थराइज हे पृथ्वीची कोर दाखवणारं छायाचित्र, कार्ल सेगनने ब्लू डॉट म्हणून ज्यावर भावनिक टिप्पण केलं ते छायाचित्र – या जगप्रसिद्ध छायाचित्रांच्या पंक्तीत आता एक नवा तारा जाऊन बसला आहे.
जेम्स वेब अवकाश दुर्बिणीने घेतलेलं हे पहिलं छायाचित्र नासाने 16 मार्चला प्रसिद्ध केलं. अवकाश दुर्बिणीचा फायदा म्हणजे अवकाश निरीक्षण करताना तिथे पृथ्वीच्या वातावरणाचा अडसर नसतो. तसंच आज आपण जागोजागी प्रकाशासाठी दिवे वापरतो त्यामुळे निरीक्षणात येणारे अडथळे तिथे नसतात.
हबल अवकाश दुर्बिणीने अनेक मनोहारी छायाचित्रांचा खजिना आपल्याला उपलब्ध करून दिला तो याच कारणांनी. हबलच्या तुलनेत जेम्स वेब तीन हजार फूट दूरवरून, आपल्यापासून पंधरा लाख किलोमीटर इतक्या दुरून अवकाशाचं निरीक्षण करणार आहे. शिवाय तिच्यात अत्याधुनिक यंत्रणा असल्याने ती सगळ्या तरंगलांबीच्या प्रकाशकिरणांचा माग घेऊ शकते. त्यामुळे हबलपेक्षा शंभरपट अचूक आणि स्पष्ट छायाचित्रं तिच्याकडून येत राहतील.
दहा अब्ज डॉलर्स इतका खर्चिक असा प्रचंड महत्त्वाकांक्षी जेम्स वेब प्रकल्प सुरू झाल्यापासून संशोधकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र तिच्या उड्डाणात अनेक कारणांनी विलंब होत गेला. कधी तांत्रिक अडचणी, तर कधी इतर काही. अतिशय गुंतागुंतीची यंत्रणा आणि तीही दुरून नियंत्रित करायची याचीही धाकधूक होती. पण या सगळ्या अडचणींवर मात करत जेम्स वेब 25 डिसेंबर 2021 या दिवशी अवकाशात झेपावली आणि 24 जानेवारी 2022 रोजी आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर तिच्यातील यंत्रणांच्या चाचण्या झाल्या. बारीकसारीक जुळण्या करून झाल्या. जेम्स वेब व्यवस्थित काम करत होती.
त्यानंतरचा टप्पा होता सुस्पष्ट चित्र मिळण्यासाठी तिची अचूक अलाइनमेंट करायचा. हाही टप्पा 11 मार्च 2022 रोजी यशस्वीपणे पार पडला, आणि जेम्स वेबचं पहिलं छायाचित्र शास्त्रज्ञांच्या हाती पडलं. निअर इन्फ्रारेड कॅमेऱ्याने पकडलेल्या या दृश्यात मध्यावर एक चमकदार तारा आहे आणि पार्श्वभूमीला दिसणाऱ्या प्रकाशमान रेघा म्हणजे खोल अवकाशातले तारे आणि तारक मंडळं आहेत. अवकाश किती दूरवर अमर्याद पसरलेलं आहे याचा अतिशय थरारक अनुभव या छायाचित्रातून येतो. गडद काळी अवकाशाची पोकळी आणि त्यातला हा लालतांबडा तारा.
अगदी ठरवूनही असा परिणाम साधता येणार नाही अशी कबुली अनेक शास्त्रज्ञांनी दिली आहे. या अप्रतिम दिसणाऱ्या ताऱ्याचं नाव आहे एचडी84406. खरं तर हा एक सर्वसाधारण सामान्य तारा आहे. जेम्स वेब दुर्बिणीची अलाइनमेंट करायला सोपा आणि योग्य त्या प्रमाणात तेज असलेला म्हणून शास्त्रज्ञांनी या ताऱ्याची निवड केली. आता मात्र या सुस्पष्ट छायाचित्रामुळे हा तारा अविस्मरणीय होऊन गेला आहे. आपल्या अवकाश मोहिमांच्या इतिहासात त्याला मानाचं स्थान मिळालं आहे!