पुणे – समाजातील आर्थिक गरजू, परंतु उत्तम गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी ‘दिशा परिवार’ आर्थिक मदत करतो. गेल्या 16 वर्षांपासून अविरत हा उपक्रम सुरू आहे. यंदाही हा उपक्रम होणार असून, येत्या रविवारी (दि. 27 ऑगस्ट) धनादेश वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
‘दिशा परिवार’चे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली. येत्या रविवारी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू हॉल येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. दात्यांचाच हस्ते मदतीच्या धनादेशाचे वितरण केले जाते, हे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमास केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग (आयएएस) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्या. (नाफेड) याचे अतिरिक्त कार्यकारी संचालक सुनीलकुमार सिंग, आमदार रवींद्र धंगेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.