इंद्रधनूचे रंग मजेचे, रंग मजेचे, रंगात त्या रंगून जायचे…
“अहा! तन्वी काय मस्त आहे तुझी नवी कविता. पण आज कविता- गाणं काय विशेष?’
“अरे मिहीर, आज हवा किती छान आहे ना. नुकताच पाऊस पडून गेला.आणि तू पाहिल नाहीस का; ऊन पडल्यावर आकाशात इंद्रधनुष्य पण दिसत होतं.’
“हो पाहिलं मी पण. पण तन्वी तू काय आज पहिल्यांदाच पाहिलं आहेस का इंद्रधनुष्य?’
“आधीसुद्धा पाहिलं आहेच की पण मिहीर, मला ना अशा वातावरणात आपोआप कविता सुचते बघ.’
“आणि तन्वी मला प्रश्न पडतात. इंद्रधनुष्य पाऊस पडल्यावरच का दिसते आणि आकाशातच का बरं?’
“मिहीर मी एकदा पावसाळा सहलीला गेले होते. तेव्हा उन्हं आल्यावर धबधब्यामध्ये इंद्रधनुष्य पहायला मिळाले होते.’
“हो आणि आत्ता मी येताना खड्ड्यातील पाण्यात, डबक्यात पाहिले.’
“आं! प्रणव तू कधी आलास आणि हे काय बडबडतो आहेस?’
“प्रणव खड्ड्यात कसे काय इंद्रधनू दिसेल आणि तन्वी तुला धबधब्यात, हे काही मला पटले नाही बर.’
“चला तर, मग आपण आईशी जाऊन बोलू. कारण मी किंवा तन्वी खोटं कशाला बोलू?’
“काय रे मुलांनो, एवढी कोणती गहन चर्चा चालली आहे?’
“काकू, तन्वी म्हणते तिने म्हणे धबधब्यात इंद्रधनुष्य पाहिले होते आणि प्रणवने डबक्यात. असं कसं शक्य आहे?’
“मिहीर सीडी घे अन् बाहेर उन्हात जाऊन बघ बरं काय होते.’
सीडीवर पण इंद्रधनुष्यासारखे सप्तरंग!
मग आता विचार करून सांगा बरं काय घडत असेल.
प्रत्येकवेळी सूर्यप्रकाशात सप्तरंग दिसले, धबधबा, रस्त्यावरील खड्डा याठिकाणी पाणी होते आणि आकाशात दिसले तेव्हा नुकताच पाऊस पडून गेला होता, मिहीर, तन्वी आणि प्रणवने त्यांचे निरीक्षण सांगितले.
“छान निरीक्षण सांगितलेत. आता सूर्यकिरणांचा आणि या गोष्टींचा संबंध काय असेल सांगा बरं,’ प्रणवच्या आईने विचारले.
‘आई, पाणी पारदर्शक आहे म्हणजे त्यातून प्रकाशाचे अपवर्तन होणार. भिंगाच्या प्रयोगाच्यावेळी आपली चर्चा झाली होती अशी.’
“प्रणव बरोबर सांगितलेस हं तू. प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा बदलते. आकाशात किंवा धबधब्यामध्ये इंद्रधनुष्य दिसते. त्यावेळी प्रकाश किरण हवेतून पाण्याच्या थेंबात व परत हवेमध्ये प्रवास करतात. प्रत्येक माध्यमातून जाताना या किरणांची दिशा बदलते. त्याचबरोबर या किरणांचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होते.याला म्हणतात “प्रकाशाचे अपस्करण.’
“पण घटक रंग म्हणजे?’ तन्वीने शंका विचारली.
“प्रकाशाचा रंग जरी पांढरा दिसत असला तरी तो इंद्रधनुष्यात दिसणाऱ्या सात रंगांपासून बनलेला आहे. ते रंग परत वेगवेगळे झालेले दिसतात.
आणि मग खड्ड्यातील पाण्यात काय होते तेथे तर पाणी घाण असते, पारदर्शक नसते.’
“एकदम बरोबरमिहीर. खड्ड्यातील पाण्यात जर ऑइल, तेल सांडले असेल तर तेथे सप्तरंग दिसतील. सीडी वर असलेले पारदर्शक पदार्थाचे कोटिंग असते त्यामुळे त्यावर सप्तरंग दिसतात.’
“काकू सात रंगांचा मिळून पांढरा रंग कसा दिसेल?’
“प्रयोग करायचा? कागदावर एक गोल काढ. त्याचे सात भाग कर अन् ते सात रंगात रंगव आणि फिरव भिंगरी करून.’
बालमित्रांनो तुम्हीही करून पाहणार ना?
– विशाखा गंधे