#CWC23 #SAvNED Toss Update : एकदिवसीय विश्वचषकाच्या 15व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
नेदरलँड्स संघाने शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमाकडे तर नेदरलँड्सचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे आहे.
धर्मशालामध्ये पावसामुळे नाणेफेकीला(Toss) उशीर झाला आहे. मात्र, आता पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण आहे. आऊटफिल्डवरून कव्हर्स काढून टाकण्यात आले आहेत, पण खेळपट्टी अजूनही झाकलेली आहे. धर्मशाळेच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे तेथील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अधिकृत प्रसारकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेफेक(Toss)आता 2 वाजता होईल, तर सामना 2:30 वाजता सुरू होईल.
दरम्यान,विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून मंगळवारी नेदरलँड्सवर शानदार विजय नोंदवून आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दुसरीकडे नेदरलँड्सने 2022 T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेर काढले होते.याचा फायदा पाकिस्तानी संघाला झाला आणि पाक संघाने उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आफ्रिकेनं नेदरलँड्सला कमी लेखणे चूक ठरेेल.