पुणे -क्रेडाई या खासगी रिअल इस्टेट विकासकांच्या सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा जक्षय शहा यांच्याकडून सतीश मगर यांच्याकडे देत असल्याचे जाहीर केले. 20 वर्षे जुन्या या संस्थेचे 23 स्टेट्स आणि 205 सिटी चॅप्टर्स आहेत तसेच 12000 हून अधिक सदस्य आहेत.
रेरा, जीएसटीमुळे नव्याने आखण्यात आलेले स्वरूप आणि 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट विचारात घेऊन भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यास आपण बांधिल असल्याचे सतिश मगर यांनी सांगितले. सर्व माजी अध्यक्षांनी गेल्या 20 वर्षांत निर्माण केलेला क्रेडाईचा दमदार वारसा पुढे नेत मगर पुढील दोन वर्षांत क्रेडाईचे अस्तित्व आणखी 100 शहरांमध्ये विस्तारित करणार आहेत. तसेच नवभारताच्या लाटेवर स्वार होत द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरांवर अधिक भर देणार आहेत.
पुढील दोन वर्षांत 1 लाख बांधकाम कामगारांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. नवी टीम रेरा, बीओसीडब्ल्यू यासारखी वैधानिक मंडळे आणि प्रशिक्षण, प्रशिक्षणवृद्धी आणि रेकग्निशन ऑप प्रायर लर्निंग (आरपीएल) तसेच केंद्र सरकारच्या इतर योजनांसाठीच्या कल्याणकारी मंडळांसोबत सहयोग जोडण्याच्या संधी धुंडाळणार आहे.