पुणे- नागरिकांना सेवा सहज व जलदगतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात. त्याच बरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात. आजपासून नागरिकांना नवीन स्वरूपात सात-बारा उतारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनाचे औचित्य साधून डिजिटल स्वाक्षरीत फेरफार व सुधारित नमुन्यातील सात-बारा आणि ई-मिळकत पत्रिका ऑनलाइन फेरफार प्रणाली दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाइन सुविधांचा आरंभ महसूलमंत्री थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन.के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जमाबंदी आयुक्त आनंद रायते आदी उपस्थित होते, तर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
महसूलमंत्री म्हणाले, “पुढील काळात विभागाच्या वतीने सात-बारा उताऱ्यावर असलेल्या फेरफार क्रमांकावर क्लिक केल्यास संगणकीकृत फेरफार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यातील 99 टक्के सात-बारा उतारे ऑनलाइन झाले आहे. राज्यात सर्वत्र एकाच नमुन्यातील सात-बारा उतारा मिळणार आहे.
तर, 2016 पासूनचे फेरफारसुद्धा ऑनलाइन मिळणार आहे. याचसह मिळकत पत्रिका ऑनलाइन पद्घतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व सुविधांमुळे नागरिकांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे कमी होत आहेत. येत्या काळात राज्यव्यापी ई-पीक पाहणीसाठी टाटा ट्रस्टचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.’
अपर मुख्य सचिव करीर म्हणाले, “महसूल विभागाला मोठी परंपरा आहे. महसूल गोळा करण्याबरोबरच नागरिकांचे जीवन अधिक समृद्ध करण्यासाची विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यानुसार काळानुरूप बदल केले पाहिजे. ई-पीक पाहणी कार्यक्रमाची राज्यभर व्याप्ती वाढवणार आहे.’
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणारे उपजिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प रामदास जगताप, वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार, वरिष्ठ तांत्रिक संचालक शुभांगी राव, नगर भूमापन कक्षाचे कार्यासन अधिकारी संजय धोंगडे, नायब तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आदी अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त राव यांनी तर सूत्रसंचालन भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक राजेंद्र गोळे यांनी केले.