वाई : वाई पोलिसांनी सराईत डीझेल चोराच्या मुसक्या आवळून, त्याच्याकडून 500 लिटर डीझेल आणि टाटा इंडिगो कार, असा अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी, वाई पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या डीझेल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित उंब्रज येथील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, हवालदार अजित जाधव, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, अक्षय नेवसे, विशाल शिंदे, प्रेम शिर्के यांनी उंब्रज येथून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 500 लिटर डीझेल व टाटा इंडिगो कार पोलिसांनी जप्त केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी वाई पोलिसांचे अभिनंदन केले.