खंडाळा – खंबाटकी बोगद्याबाहेरील असलेल्या तीव्र वळणावर मंगळवारी मालवाहतुकीचा ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू झाला. तर या घटनेत एक जण जखमी झाला आहे. याबाबत खंडाळा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 21 रोजी सायंकाळी बोगद्याबाहेरील पहिल्या वळणावर ट्रेलर क्रमांक (एन.एल.01 ए.जी. 3758) हा चालकाच्या बाजूस पलटी झाला. यामुळे ट्रेलर चालक सागीर शौकत खान (वय 38) याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर तस्लिम शौकत खान (वय 23, दोघे रा. मायापूर, ता. तिजोरा, जि. अल्वर, राजस्थान) हा किरकोळ जखमी झाला.
घटनेची माहिती कळताच खंडाळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. याबाबत तस्लीम शौकत खान याने खंडाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून खंडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत. संबंधित ट्रेलर हा चेन्नईवरून शिंदेवाडी ता. खंडाळा या ठिकाणी येत होता. जवळपास बाराशे किलोमीटर अंतर पार करून आलेला ट्रेलर अवघ्या वीस किलोमीटर आधी अपघातग्रस्त झाला व दोन सख्ख्या भावातील थोरला भाऊ जागीच ठार झाला. यामुळे तस्लिम शेख हा त्याचा धाकटा भाऊ शोकाकूल झाला होता. हे वळण आणखी कितीजणांचा बळी घेणार ? असा प्रश्न पुन्हा अपघाताने अधोरिखत झाला आहे.