सातारा – भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा 2023- 24 च्या 53 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारा (दि. 29) दुपारी 3 वाजता सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते व विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांचा रविवारी दि. 29 रोजी वाढदिवस आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमणारा माणूस म्हणजे मकरंद पाटील असून यामुळे त्यांच्या वाढदिनी वाई- खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्ते करीत असतात. या दिनाचे औचित्य साधूनच कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ करण्याचे नियोजिलेले आहे.
यादिवशी कारखाना कार्यस्थळावर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध प्रकारच्या आजारांचे निदान होऊन त्यावर मोफत उपचारही करण्यात येणार आहेत. किसन वीर व किसन वीर- खंडाळा कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ नुकताच झाला असून कारखान्यातील सर्व कामेही झालेली असून कारखाना गळीत करण्यासाठी सज्ज झालेला आहे.
यानिमित्ताने सभासद व बिगरसभासद शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस किसन वीर भुईंज व किसन वीर -खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी देण्याचे आवाहनही केलेले आहे. किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.