उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज शिवसैनिकांचा मेळावा
सातारा – नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून, या अनुषंगाने साताऱ्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा उद्या, दि. 4 रोजी दुपारी 2 वाजता समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व मेळाव्याचे संयोजक सचिन मोहिते यांनी दिली. या मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती असल्याने या मेळाव्याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. सातारा शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. सातारा पालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सुरू झाली आहे.
पक्षाच्यावतीने स्वतंत्र पॅनेल निवडणुकीत उतरवायचे की महाविकास आघाडीचा फार्मुला वापरायचा, याचा निर्णय लवकरच होणार आहे. जिल्हा व शहर कार्यकारिणीत रचना आणि कार्यक्रमांविषयी मतभेद आहेत.
या मेळाव्याच्या निमित्ताने हे मतभेद मिटवण्याचा बानुगडे-पाटील यांचा प्रयत्न आहे. या मेळाव्यात पक्षाची ताकद दिसावी, अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे. शिवसेनेच्या रचनेतील नव्याने घोषित झालेले संघटकपद हा वादाचा मुद्दा ठरला आहे.