शिवसमर्थ भक्तांची दिवाळीची झाली पहाट शिवमय; मशाल महोत्सवात हजारो शिवप्रेमींची उपस्थिती
ठोसेघर – “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजी आणि शेकडो मशालींनी किल्ले सज्जनगडाचा अवघा आसमंत उजाळला गेला होता. यावर्षीचा चौथा मशाल महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची बस स्थानक ते सज्जनगड पालखीतून मिरवणूक, शिंग, तुतारी, हलगीचा निनाद आणि शेकडो मशालींच्या प्रकाशात मर्दानी आगीचे चित्त थरारक खेळ याचा आनंदोत्सव हजारो शिव, समर्थप्रेमींनी अनुभवला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समर्थ रामदास स्वामींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता आणि शिवसमर्थ भक्तांची दिवाळीची पहाट शिवमय झाली होती.
फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये अवघा आसमंत उजाळून गेला तर शेकडो धगधगत्या मशालींनी सज्जनगड तेजोमय झाल्याचे अनोखे चित्र सर्वांनी अनुभवले. दुर्ग प्रतिष्ठानतर्फे रविवारी पहाटे ठीक साडेतीन वाजता किल्ले सज्जनगड मशाल महोत्सवास सुरुवात झाली. यावेळी सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शेकडो शिवसमर्थ भक्त सज्जनगडावर दाखल झाले होते. “आपला सज्जनगड, आपलीच जबाबदारी ‘, “एक दिवा शिव समर्थ चरणी’ या उपक्रमांतर्गत किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो.
पहाटे साडेतीन वाजता भव्य मिरवणुकी सुरुवात करण्यात आली सुरुवातीस हलगी वादक यानंतर पारंपारिक पोशाखामध्ये शिंग, तुतारी वादक त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची फुलांनी चांदीच्या मखरांनी सजवलेली पालखी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत शेकडो युवक, युवती मशाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत किल्ले सज्जनगडावर येत होते. सज्जनगडावर पालखी दाखल झाल्यावर समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश व रामदासी यांच्या हस्ते पालखीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
यानंतर पालखी मिरवणूक अंगलाई देवी मंदिर येथे प्रदक्षिणा घालत धाब्याच्या मारुतीकडे दाखल झाली यावेळी फटाक्यांची आतषबाजी असा हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी परळी पंचक्रोशीतील युवक दाखल झाले होते. पालखीची मिरवणूक धाब्याचा मारुती मंदिर या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी चित्त थरारक असे आगीचे सहासी खेळ आयोजित करण्यात आले होते.
हे आगीचे खेळ झाल्यानंतर पालखी समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिरा नजीक आणण्यात आली या ठिकाणी मर्दानी व साहसी खेळ आयोजित करण्यात आले होते. यावेळी आकाशात सुरू असलेली फटाक्यांची आतषबाजी व शेकडो जनसमुदायासमोर सुरू असलेल्या मर्दानी खेळाने उपस्थित असलेल्या शिवसमर्थ भक्तांची दिवाळीची पहाट शिवमय झाली. मर्दानी खेळ संपन्न झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती समोर ध्येयमंत्र खड्या आवाजात म्हणण्यात आला यानंतर उपस्थित सर्व शिवप्रेमींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
तटबंदीला फुलांची सजावट
मशाल महोत्सवाचे चौथे वर्ष मोठया उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी गडाच्या तटबंदीला फुलांची सजावट करण्यात आली होती. ही फुलांची सजावट तसेच उभारण्यात आलेले महाराजांचे मोठे फ्लेक्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. फुलांच्या सजावटीमुळे तटबंदीला गतवैभव मिळाल्याचे चित्र दिसत होते.
परजिल्ह्यातील मावळ्यांचा मोठा सहभाग
मशाल महोत्सव हा आपला सज्जनगड आपली जबाबदारी या वाक्याखाली रुपरेषा आखण्यात आल्याने सर्व माध्यमातून याचा प्रसार मोठ्याप्रमाणावर करण्यात आल्याने हा अनुभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मावळ्यांनी उपस्थितीती दर्शवली होती.