राजेंद्र वाघमारे
नेवासा – खासदार सदाशिव लोखंडे यांचा राजकारणातील स्पष्टवक्तेपणा, कोणाचीही भीडभाड न धरता चिरफाड करत असल्यामुळे सर्वसामान्य माणूस खासदार लोखंडे यांच्या राजकारणावर खुश आहे. शिवसेनेत दोन गट पडलेले असताना राजकीय नफ्या-तोट्याचा विचार न करता खासदार लोखंडे शिंदे गटात समील होणारे राज्यातील पहिले खासदार आहेत. त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील वाढता प्रभाव व जिल्ह्यातील शिवसेनेचे मुख्य सूत्रे हाती असल्यामुळे मातब्बर नेतेमंडळीही चांगलीच अव्ाक झाल्याचे राजकीय चित्र दिसत आहे. त्यामुळे खासदार लोखंडे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्ह्यात हुक्कमी एक्के बनले असल्याचे सध्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या 17 दिवसांत शिर्डी मतदारसंघात खासदार होण्याचा “मान’ सदाशिव लोखंडे यांनी मिळवून ते राज्यातच नव्हेतर देशात प्रसिद्धी झोतात आले. खासदार लोखंडेच्या नशिबातच आता “राजयोग’ असल्याचे जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेतेमंडळी त्यांना हसतमुखाने बोलू लागली आहेत. राजकारणातील त्यांचा गाढा अभ्यास आणि स्पष्टोक्तेपणामुळे ते पुन्हा दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही या मतदार संघात खासदार झाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील आमदार शिंदे गटात सामिल झालेले होते. त्यामुळे शिवसेनेत उघड दोन गट पडलेले असतानाच राज्यातील पहिले एकमेव खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा धाडसी निर्णय घेतला.
नगर जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेची सूत्रे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे अनाहूतपणे हाती आलेली आहे. खासदार लोखंडे यांचा स्पष्टोक्ता स्वभाव, राजकारणात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आणि संपर्कात आलेल्या सामान्य कार्यकर्त्याला जीव लावण्याची पद्धत यामुळे खासदार लोखंडे यांच्या संपर्कात आलेला कार्यकर्ता त्यांच्यापासून कधीही बाजूला जात नाही. त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय करिष्म्यातून ते वेळोवळी सिद्ध झाल्यामुळेच नवख्या शिर्डी लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान मिळवून आता हॅट्रिककडे वाटचाल सुरू केलेली आहे.