रहिमतपूर – गेल्या तीन दशकांची परंपरा असलेली रहिमतपूर नगरीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी महाराष्ट्रभर मान्यता पावलेली रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील मातोश्री कुसुमावतीदेवी माने स्मृती व्याख्यानमाला शुक्रवार दि. ५ जानेवारी व शनिवार दि. ६ जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे, अशी माहिती पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने-कदम यांनी दिली.
रहिमतपूर नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, शिल्पकार, पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्व. सरदार बाबासाहेब माने यांनी सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिकविषयक अभिरुची असणा-या आपल्या मातोश्री कुसुमावतीदेवी माने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरु केली. त्यांच्या पश्चात ही प्रबोधनाची परंपरा अखंडितपणे सुरु आहे.
या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवार दि.५ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता प्रसिद्ध ग्रामीण कथा, कादंबरीकार प्रा. व. बा. बोधे हे ‘हसण्यासाठी जन्म आपला’ या विषयावर गुंफणार आहेत. शनिवार दि. ६ रोजी सकाळी १०:३० वाजता प्रसिद्ध इतिहास संशोधक, शिवचरित्रकार डॉ. अशोक बांगर हे ‘युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. पंचक्रोशी शिक्षण मंडळ , ‘चैत्रबन’ परिसर वडूजरोड रहिमतपूर येथे आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ रहिमतपूर पंचक्रोशीतील रसिक श्रोते, विद्यार्थी , विद्यार्थिंनीं, महिला व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.