50 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय; 850 कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट
कराड – महाराष्ट्र राज्यातील सर्वांसाठी बॅंकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आणि व्यवसाय वृद्धीसाठी कृष्णा सहकारी बॅंकेने राज्यभर शाखा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. या धोरणानुसार बॅंकेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्र करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बॅंकेच्या 50 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि बॅंकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अक्षता मंगल कार्यालयात बॅंकेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे यांच्यासह कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, श्रीरंग देसाई, जे. डी. मोरे, बाबासो शिंदे, शिवाजी पाटील, वसंतराव शिंदे, बाजीराव निकम, विलास भंडारे, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील, पं.स. सदस्य बाळासाहेब निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेत बोलताना चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, की गेल्यावर्षी आलेल्या करोना संकटामुळे सर्वच क्षेत्रांबरोबरच बॅंकींग क्षेत्रासमोरही अनेक आव्हाने निर्माण झाली. पण या काळात सभासद व ठेवीदारांच्या सहकार्यामुळे बॅंकेने आपले व्यवहार, सर्व नियमांचे पालन करून सुस्थितीत ठेवले. याचाच परिणाम म्हणून करोना काळातही बॅंकेने उत्तम प्रगती करत, गेल्या आर्थिक वर्षात 650 कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला.
किंबहुना सन 2020-21 या वर्षात बॅंकेचा एकूण व्यवसाय 96 कोटींने वाढला आहे. या वर्षात बॅंकेच्या ठेवींमध्ये 8267.94 लाख इतकी लक्षणीय वाढ झाली असून, 31 मार्च 2021 अखेर बॅंकेच्या ठेवी 43576.19 लाख इतक्या झालेल्या आहेत. गेली सलग 9 वर्षे बॅंकेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के राहिला आहे. बॅंकेचे आर्थिक आरोग्य हे भांडवल पर्याप्ततेच्या प्रमाणावर तपासले जाते. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार भांडवल पर्याप्तता प्रमाण 9 टक्क्यांच्या वर असावे लागते.
कृष्णा बॅंकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 17.63 टक्के एवढे झाले असून, बॅंकेला “अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. बॅंकेने मिळविलेल्या नफ्याच्या अनुषंगाने सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला. येत्या आर्थिक वर्षात बॅंकेने 850 कोटींचा व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्या 50 वर्षात बॅंकेच्या वाटचालीत अनेक चढउतार आले, पण प्रत्येक संकटावर मात करत कृष्णा बॅंक आज प्रगतीपथावर पोहचली आहे. बॅंकिंग क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत.
तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. या सर्व नव्या गोष्टींचा अवलंब करत, कृष्णा बॅंक पुढे वाटचाल करत आहे. सभासद व ग्राहकांच्या विश्वासाला पात्र राहून कार्य करत असल्यानेच आज कृष्णा बॅंकेचा मोठा विस्तार होत आहे. सभेला कृष्णा बॅंकेचे संचालक प्रदीप थोरात, हर्षवर्धन मोहिते, प्रमोद पाटील, हणमंत पाटील, बाळासो पवार, महादेव पवार, चंद्रहास जाधव, नामदेव कदम, तातोबा थोरात, संतोष पाटील, ड. विजय पाटील, बॅंकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे चेअरमन सचिन तोडकर, राजेंद्र कुंभार, गुणवंत जाधव यांच्यासह सभासद उपस्थित होते.