सातारा – साताऱ्यानजीक कोडोली परिसरातील चंदननगर येथील जानाई मळाई डोंगराच्या पायथ्याला गुरुवारी मानवी कवटी सापडली. एका भटक्या कुत्र्याने ही कवटी तोंडातून ओढून आणून एका घरासमोर टाकली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोणाचा घातपात झाला आहे की काय, अशी शंका व्यक्त होत असून सातारा शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही कवटी तपासणीसाठी पुण्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली परिसरातील जनाई मळाई डोंगराच्या पायथ्याला असलेल्या वस्तीत गुरुवारी एक मानवी कवटी सापडली. भटक्या कुत्र्याने ही कवटी ओढत आणून ती एका घरासमोर टाकली. ही घटना समजल्यावर नागरिकांची गर्दी जमली.
याबाबतची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सपोनि प्रशांत बधे घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनीही तेथे भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. याबाबत पोलीस रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते.