कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (मलकापूर, ता. कराड) येथे महामार्ग ओलांडत आयशर टेम्पोच्या धडकेत सातारा जिल्हा बॅंकेचे अधिकारी रणजित भाऊसाहेब नाईक (वय 49, रा. कोयना वसाहत, ता. कराड) हे जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9.45 च्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रणजित नाईक हे दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी कामानिमित्त डी मार्टजवळ आले होते. ते महामार्ग ओलांडत असताना पुण्याकडून कोल्हापूरकडे निघालेल्या आयशर टेम्पोने (एमएच-11-सीएच-0155) त्यांना जोराची धडक दिली. त्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे रस्ता ओलांडताना त्यांच्या डोक्यावर हेल्मेट होते, तरीही त्यांच्या डोक्याला जीवघेणी दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नाईक हे मुळचे अहमदनगर येथील असून ते नोकरीनिमित्त कोयना वसाहतीत रहात होते. या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.