सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्हयात करोनाबाधित रुग्णांची संख्या 79 वर पोहचली आहे. करोनाग्रस्त व गंभीर रूग्णांना उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझमा थेरपीच्या उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयाला “आयसीएमआर’ची मान्यता मिळाली आहे. या थेरपीच्या मान्यतेसाठी सातारा जिल्हा रुग्णालयाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. रक्तपेशीतील घटक शास्त्रीय पद्धतीने विलग करणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञान व मशिनरीची झटपट ऑन लाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आयसीएमआर व एफडीए या दोन्ही संस्थांच्या मान्यतेनंतर लवकरच येथील मेट्रो ब्लड बॅंकेत प्लाझमा थेरपीची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पुणे जिल्हयात ससून सरकारी रुग्णालयाने आयसीएमआर व एफडीएच्या अनेक तांत्रिक चाचण्यांनंतर प्लाझमा थेरपीने रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी मिळवली आहे. करोनाच्या आजारातून पूर्ण बऱ्या झालेल्या व्यक्तीचा प्लाझमा तपासणीनंतर स्वीकारला जातो व करोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना या प्लाझमाचा वापर करून प्रतिकारशक्तीत सुधारणा घडवून आणली जाते. प्लाझमामध्ये असणाऱ्या अँटी बॉडीज संसर्ग करणाऱ्या विषाणूंवर हल्ला करतात.
मेट्रो रक्तपेढीचे फायदे
रक्तातील प्लाझ्मा, प्लेटलेट्स, फ्रेश प्लाझ्मा असे पाच घटक वेगळे करता येतात. रक्ताची एक पिशवी दोन ते तीन रुग्णांचे प्राण वाचवू शकते. या रक्तपेढीमध्ये एक हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करता येणार आहे. पण्यातील ससूननंतर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात प्लाझमा थेरपी उपलब्ध झाल्यास करोनाच्या अंतिगंभीर रुग्णांच्या उपचारांचा मोठा टप्पा गाठला जाणार आहे.
लाल फितीच्या कारभारात प्रकल्प रखडला
“मेट्रो रक्तपेढी’ची आवश्यकता ओळखून आरोग्य खात्याने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ती सुरू करण्याची घोषणा केली. त्यातील पहिली रक्तपेढी औंध जिल्हा रुग्णालय (पुणे) सुरू करण्याचे निश्चितही झाले. 2012 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले व 2013 ला पूर्ण झाले. त्याच धर्तीवर रक्तपेढीसाठी अत्यावश्यक सातारा जिल्हा रुग्णालयात मेट्रो ब्लड बॅंकेच्या इमारतीचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, सरकारी छापाच्या गलथानपणाने जिल्ह्यातील बहुसंख्य यंत्रणा पुण्याला गेली. सहा महिन्यांपूर्वी राज्य रक्त संकलन परिषदेचे संचालक डॉ. अशोक थोरात यांनी पाहणी करून सहा महिन्यांत मेट्रो ब्लड बॅंक प्रकल्प सुविधा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. हाफकिन इन्स्टिट्यूटकडून दहा मशीन टप्याटप्याने खरेदी केली जाणार आहे. त्याची ऑनलाईन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. केवळ काही तांत्रिक प्रक्रियांची औपचारिकता बाकी असल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी स्पष्ट केले.