नवी दिल्ली : सध्याच्या घडीला करोनावर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने अत्यंत महत्वाचे पाऊल टाकले आहे. हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे. औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी आयआयसीटीने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत. गिलीयड सायन्सेस या औषध कंपनीने रेमडेसिविर औषधाची निर्मिती केली आहे. अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये या औषधाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे.
फॅव्हीपीरावीर नंतर रेमडेसिविर हे करोनावर प्रभावी ठरणारे आणखी एक औषध आहे. हे औषध भारतात बनवण्यासाठी सीएसआयआर खासगी क्षेत्रासोबत मिळून क्लिनिकल चाचण्यावर काम करत आहे. रेमडेसिविर बनवण्यासाठी पायरोल, फुरोन और फॉस्फेट हे तीन प्रारंभीचे महत्वाचे घटक आहेत. केएसएमचे संश्लेषण हा रेमडेसिविर औषध निर्मितीमधील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे असे आयआयसीटीचे संचालक डॉ. श्रीवरी चंद्रशेखर यांनी फोनवरुन सांगितले.
अमेरिकेत १०६३ रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. त्यात रेमडेसिविर औषध प्रभावी ठरत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा दिसून आली. शिवाय हे औषध करोना व्हायरसला ब्लॉक करते असा अमेरिकन संशोधकांचा निष्कर्ष आहे.