फलटण – अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधून, फलटणचे आराध्यदैवत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिराच्या शिखराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत सोमवारी उत्साहात करण्यात आला.
श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून सोमवारी दुपारी 12.20 वाजता शिखर जीर्णोद्धाराचा शुभारंभ विधिपूर्वक करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.