सातारा – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी साताऱ्याच्या राजघराण्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे बुधवारी साताऱ्यात संतप्त पडसाद उमटले. सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्यावतीने या वक्तव्याचा गुरूवारी सकाळी राजवाडा येथील गांधी मैदान येथे निषेध करण्यात येणार आहे.
या निषेध आंदोलनाचे नेतृत्व स्वतः आमदार शिवेंद्रराजे भोसले करणार असून सातारा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक व भाजप कार्यकारिणी यांच्यावतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी एका वृत्तपत्राच्या जाहीर कार्यक्रमात साताऱ्याच्या राजघराण्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.
या वक्तव्याचे प्रक्षेपण होताच सातारा शहरात त्याचे संतप्त पडसाद उमटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्याच्या राजघराण्याचा शिवसेनेने अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. साताऱ्यातही या विधानाचा नेटकऱ्यांनी जोरदार समाचार घेतला.
राऊत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
सातारा जिल्हा भाजपच्यावतीने या प्रकरणाचा राजवाडा गांधी मैदान येथे गुरूवारी सकाळी अकरा वाजता निषेध करणार असल्याची माहिती भाजपच्या गटनेत्या सिध्दी पवार, उपनगराध्यक्ष किशोर साळुंखे व शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली.
नगराध्यक्ष माधवी कदम यांच्यासह सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी व भाजपचे असे चाळीस नगरसेवक व भाजप जिल्हा कार्यकारीणीचे सर्व सदस्य या निषेध सत्रासाठी राजवाडा गांधी मैदान येथे एकत्र येणार आहेत. याठिकाणी निदर्शने करून नगरसेवक साताऱ्यातून निषेध रॅली काढणार आहेत. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना या संदर्भात निवेदन दिले जाणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः आमदार शिवेंद्रराजे भोसले करणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.