कराड – येणके (ता. कराड) येथील शिवारात ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं उचलून नेले. काही अंतर गेल्यावर त्या मुलाला ठार करून त्याला तिथेच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली. ही घटना आज सोमवार दि.15 रोजी सकाळच्या सुमारास घडली.
आकाश पावरा (वय 3) असं त्या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळं परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून ग्रामस्थांनी त्यांच्यावर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा न लावल्यामुळे रोष व्यक्त केला आहे.
दरम्यान, घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. त्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली होती. मात्र, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावण्यात न आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बिबट्याच्या अशा हल्ल्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.