ओतूर – संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराममहाराज जन्म सोहळा धार्मिक विधी, पूजा पाठ, प्रवचनाच्या कार्यक्रमाने करोनाबाबत शासनाचे सर्व नियम पाळून उत्साहात संपन्न झाला. येथे संतश्रेष्ठ जगद्गुुरू संत तुकाराममहाराज स्वप्नदृष्टांत मंदिर येथे माघ शुद्ध दशमी पाच शके 1940 वसंत पंचमी मंगळवारी (दि. 16) संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने हे ठिकाण वारकरी सांप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचे मानले गेले आहे. तसा उल्लेख तुकाराम गाथेमध्ये चैतन्य विजय ग्रंथामध्ये देखील झालेला आहे. ओतूर येथील जानु तेल्याच्या बखळ जागेत संत तुकाराम महाराजांनी मुक्काम केला होता. त्याच जागेत येथील पांडुरंगमहाराज घाटकर यांचे चिरंजीव वासुदेव घाटकर व नातू राम व कृष्णा घाटकर कुटुंबाने स्वखर्चाने संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारले आहे.
मागील वर्षी जानेवारीमध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व विविध धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. तो दिवस संत परंपरेनुसार मंगळवारी (दि. 16) धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. मूर्तीस महाभिषेक करण्यात आला व महाआरती करून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सकाळपासूनच ओतूर परिसरातून भाविक भक्त वारकरी दर्शनासाठी येत होते.
सकाळी साडेदहा ते साडेबारा वाजता भागवताचार्य रामायणाचार्य बालयोगी ब्रह्ममूर्ती हभप बाबाजीमहाराज चाळक यांचे प्रवचन, दुपारी दोन तीन वाजता सांप्रदायिक भजन सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजता संगीत भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम या निमित्त आयोजित करण्यात आले होते. तसेच धार्मिक विधिवत पूजा पाठ असे कार्यक्रमाचे आयोजन घाटकर परिवार, समस्त तिळवण तेली समाज, बाजार पेठेतील व्यापारी व ग्रामस्थ यांच्यावतीने संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते.
याप्रसंगी हभप पांडुरंग घाटकर, राम घाटकर, कृष्णा घाटकर, जि. प. सदस्य मोहित ढमाले, ओतूरच्या सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, सुनील चांदवडकर, संजय दिवटे, नितीन पन्हाळे, डॉ. मनिष वोरा, राजयोग कर्डिले, सुनील शहा, शांताराम डुंबरे, संतोष कर्डिले, भरत जंगम, बाळासाहेब जंगम, मंगेश डुंबरे, अंकुश कर्डिले, प्रवीण कर्डिले, अतुल शहा, योगेश खेत्री, राजेंद्र खेत्री, हभप तुकाराममहाराज ढोमसे, हभप गंगाराम महाराज डुंबरे, हभप विष्णुपंत महाराज ढमाले, विठ्ठल शितोळे, संजोग काळदंते, विशाल पेंडभाजे, आशिष शहा, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.