सोलापूर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे आज, रविवारी सकाळी दहा वाजता सोलापूर येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत साधक होते. त्यांनी तरुण वयात काही काळ विविध दैनिकांमध्ये नोकरी केली होती. संत साहित्य, संत चरित्रे यावर त्यांनी विविध दैनिकातून विपुल लेखन केले आहे.
अध्यात्मिक विषयांवरील त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले होते. संत साहित्य सेवा संघातर्फे त्यांचा पुरुषोत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. तसेच अन्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
दरम्यान, प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांच्या निधनाने संत साहित्याचा एक श्रेष्ठ अभ्यासक आपण सर्वांनी गमावला आहे, अशा शब्दात मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.