बेंगळूरू – राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मानवी तस्करी प्रकरणी काही जणांवर छापे घातले आहेत. या प्रकरणामध्ये काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. या छाप्यांदरम्यान एनआयएने गुन्हेगारीशी संबंधित काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
एनआयएने बेंगळुरू शहरातील दोन ठिकाणी छापे घातले. बांगलादेशी मानवी तस्करासाठी बनावट ओळखपत्रे करणाऱ्या एका व्यक्तीशी संबंधित ही दोन्ही ठिकाणे होती, असे एनआयएने म्हटले आहे.
या छाप्यांदरम्यान गुन्हेगारीशी संबंधित कागदपत्रे, कॉम्प्युटर हार्ड डिस्क, मोबाईल अशी 6 डिजीटल उपकरणे ताब्यात घेण्यात आली आहेत.
हे प्रकरण बांगलादेशी महिलेशी संबंधित आहे. नोकरीच्या आमिषाने या महिलेला भारतात आणण्यात आले होते. मात्र नंतर तिला वेश्याव्यवसायात गोवण्यात आले होते. या महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिल्याबद्दल तिचा छळ देखील केला गेला होता.
आरोपींनी केलेली व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यावर बांगलादेशातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे आरपींचा शध घेतला गेला आणि बेंगळुरू पोलिसांनी या आरोपींना अटक केली होती.