विश्वमाऊलींचा संजीवन समाधी सोहळा!

आळंदी देवाची – आज या आधुनिक एकविसाव्या शतकामध्ये, संजीवन शब्द ऐकला तरी थोडंस आश्चर्य वाटतं. कारण आपण विज्ञानाच्या आधुनिक शतकामध्ये जगतो आहोत. आणि कोणतीही आपल्या आवाक्याच्या विचारांच्या पलीकडची पृथ्वीवरची दुर्मिळ घडलेली घटना आपण अमान्य करायला पाहतो.

एक तर आपल्या बुद्धीची, विचारांची, अध्यात्माची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची झेप तिथपर्यंत जात नाही. कुठेतरी आपल्या विचारांची वैज्ञानिकता कमी पडते. कारण आपल्या विचारांची क्षमता माणूस फक्त 100 वर्ष जिवंत राहू शकतो इथपर्यंत आहे. याच्यापुढे आपल्या वैज्ञानिक विचारांची उंची जात नाही, किंवा आपण नेण्याचा प्रयत्न करत नाही. विज्ञानच तिथपर्यंत जाऊ शकत नाही.

कारण विज्ञानाने भरपूर शोध लावले लागत आहेत पण विज्ञानाने अजून पर्यंत एक शोध लावण्याचा प्रयत्न करूनही लागला नाही तो म्हणजे आपल्या शरीरातील तत्व आणि ज्या दिवशी या तत्त्वाचा विज्ञानाला शोध लागला तो शोध विज्ञानाचा अंतिम शोध असेल, का? या तत्त्वाचा विज्ञानाला शोध लागला तर विज्ञानाने मृत्यूवर ताबा मिळवला असे होईल पण ते अशक्य, कारण वेदांताच्या दृष्टीने हेच तत्व जाणलं तर जगातल्या अन्य वस्तू जाणण्याची आवश्यकताच नाही.

त्या आपोआप आणल्या जातात. या शरीरामध्ये एखादं तत्त्व आहे याचा शोध विज्ञान लावू शकलं नाही तर विश्वव्यापक चैतन्य ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी पर्यंत कधी पोहोचणार म्हणून आधुनिक विज्ञान कुठेतरी पाठीमागेच अपुरं पडल्यासारखं वाटतं, नाही अपूर्णच आहे. ज्या तत्त्वापर्यंत विज्ञान पोहोचलं नाही त्या तत्वावर विश्व माऊली ज्ञानोबाराय यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. विज्ञानाची झेप अजून जिथपर्यंत गेलीच नाही तेथून ज्ञानोबारायांच्या वास्तव प्रतिभेची झेप सुरू होते.

ही विश्व माऊलींची ज्ञानेश्वरी रूपाने घेतलेली झेप प्रत्येक मनुष्याला त्याच्या स्वतःच्या आत मध्ये असणाऱ्या तत्त्वाचे ज्ञान करून देणारी आहे. विश्व माऊली ज्ञानोबाराय यांनी हे तत्त्व जाणण्याच्या अगोदर अपुर पडणार विज्ञान जाणा आस ठामपणे सांगितलय ज्ञानेश्वरीत सातव्या अध्यायामध्ये, या ओवी वरून विश्वमाऊली वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या तत्वा कडे नेणारे आहेत.

विश्व माऊलींनी विज्ञानाचा त्याग नाही केलेला अगोदर विज्ञान जाणा नंतर तत्व (एथ विज्ञानें काय करावें /ऐसें घेसी जरी मनोभावें/तरी पैं आधीं जाणावें/तेंची लागे/)ज्ञा.7.3) ते तत्व जाणण्याच्या अगोदर विज्ञान जाणा,विश्वमाऊलींना ठाऊक आहे हे तत्व विज्ञानाच्या गवसणीमध्ये येणार नाही पण विज्ञान जाणून ज्ञानेश्वरीचा अनुभव घ्या.

अशा वैज्ञानिक संत शास्त्रज्ञ ज्ञानेश्वरी कर्त्याच्या संजीवन समाधीवर आपण विचार करणे म्हणजे सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवल्या सारखे होईल. जिथं विज्ञानाचे हात पोहोचत नाहीत तिथं आपल्या शब्दप्रपंच्याने संजीवन समाधीचे विश्लेषण काय करणार, तरीही एकदा विश्व माउलींची संजीवन समाधी आहे का नाही याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन झालंत. तो काळ होता 1972 चा मामासाहेब दांडेकरांचा, त्या काळामध्ये काही व्यक्तींनी सांगितले संजीवन समाधी नाही.

मामा साहेबांच्या समोर हा मोठा प्रश्न पडला होता यांना काय उत्तर द्यायचं. त्यावेळेसचे थोर शास्त्रज्ञ R.n. शुक्ल साहेबांनी मामांना सांगितलं आपण वैज्ञानिक दृष्टीने संजीवन समाधी आहे का नाही याच संशोधन करू पुढचे माऊली पाहून घेतील. समाधी नाकरणाऱ्यांना दुसरा काय पुरावा देणार. शुक्ल साहेबांनी तीन मीटर आणले.१) गिगर म्युलर काऊंटर 2) थरमिस्टर बोलोमीटर ३) फ्रिक्वेन्सी मीटर गीगर मीटरने तिथे काही ऊर्जा चेतना आहे का नाही पाहता येते.

हे तीनही मिटर संजीवन समाधीजवळ ठेवण्यात आले. हा प्रयोग करत असताना पाश्चात्त्य देशातील तीन माणसे पण उपस्थित होती जी माणसे संजीवन समाधी नाकारत होती तेही तिथे उपस्थित होते या सर्वांच्या समोर मीटर्स इथे काहीतरी ऊर्जा चेतना आहे हे रेडिंग दाखवायला लागले. संपूर्ण लोक अवाक् झाले, मिटरला कोणी हात लावत नव्हते आणि तीनही मीटर्स पासून संपूर्ण लांब होते, मग रेडींग दाखवणारे चैतन्य स्पुरक स्पंदने म्हणजे चैतन्य लहरी कुठून येतात, हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आणि ज्यांनी समाधी नाकारली त्यांच्याही लक्षात आले इथे काहीतरी चैतन्य ऊर्जा आहे.

म्हणूनच त्याचा आलेख मीटरवर जाणवतो या वैज्ञानिक दृष्टिकोनाने समाधी नाकारणाऱ्यांचा संभ्रम दूर झाला. आणि हीच मंडळी प्रत्येक सहा महिन्याला आळंदी मध्ये दर्शनाला येऊ लागले त्या पाश्चात्य माणसांपैकी एकाने स्वतःला विश्व माऊलींच्या चरणाला वाहून घेतले. म्हणून विश्वव्यापक संजीवन समाधी ला विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही.

विज्ञान नाकारू शकत नाही म्हणजे विज्ञानाला विश्वमाऊली समजले असं नाही. संजीवन समाधी म्हणजे विश्वमाऊलींच्यां भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शरीरातील पंचमहाभूते शिल्लक राहत नाही. ही पंचमहाभूते ज्याच्या त्याच्या अंशात विलीन होऊन जातात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र ही धातू सुद्धा शरीरात राहात नाहीत. ज्ञानेश्वरीत ६ व्या अध्यायामध्ये कुंडलिनी, अष्टांगयोग, संजीवन समाधी यांच मूळ विश्लेषण आलेल आहे. योग्याच्या शरिराला म्हातारपण येत नाही तारुण्याचा ही वियोग होतो बाल्यावस्था परत येते.

कारण हीअष्टांग योगाची अंतिम अवस्था आहे (जे आप आणि पृथ्वीचे/अंश नाहीं) ज्ञा.६.-268 त्या योग्याचे शरीर वाऱ्यासारखे हलके बनते तो योगी जीवन-मरणाच्या पलीकडे गेलेला असतो. त्याच अनुसंधान फक्त भगवंता बरोबर असतं, यालाच निर्विकल्प समाधी म्हणतात. या समाधीमध्ये योगी हजारो-लाखो वर्ष जशास तसाच राहतो. हे तर योग्यांचे वर्णन आहे, आणि विश्व माऊली तर योगीराज आहेत. योग्यांचे राजे आहेत.

याच योग साधनेच्या जोरावर १४०० वर्ष जगलेल्या चांगदेवांना विश्वमाऊली चांगदेव पासष्टीच्या रूपाने उपदेश करतात, तर विश्व माऊली किती मोठे योगीराज आहेत याची आपण कल्पनाही करू शकत नाहीत. जे जगताच मूळ महातत्व (भगवंत) त्यांचे विश्व माऊली संजीवन समाधी घेत असताना माऊली विषयी उद्गार आहेत.

(देवो म्हणती रुक्मिणी/हा एकच योगी देखीला नयनी/हेची ज्ञान संजीवनी/जान त्रेलोक्यासी) ना.म. संपूर्ण विश्व ज्यांचं भक्ती करत त्या महातत्त्वाने (भगवंताने) म्हणावं रुक्मिणी हा एकच योगीराज मी माझ्या डोळ्याने पाहिला आणि हाच ज्ञानस्वरूप असणारा योगीराज त्रेलोक्यासाठी संजीवनी आहे. ज्ञानोबारायांच्या रुपान ज्ञानच जन्माला आलेल आहे. आणि ज्ञान हे संजीवनच असतं. विश्वमाऊलींची जी समाधी आहे ती योग्यांचे राजे मूर्तिमंत ज्ञानाची संजीवन समाधी आहे. आणि ही ज्ञानरुपी संजीवन आई आजही वारकऱ्यांच्या अनुभवाला येत आहे.

यावर्षी विश्व माऊलींचा 725 संजीवन समाधी सोहळा आहे. प्रत्येक वारकरीरुपी लेकराला आईच्या समाधीवर डोके ठेवण्याची आर्तता आहे, पण नियतीच्या मनात भेट घडु न देणं आहे. जसं वारकऱ्याला आई कडे जाण्याची इच्छा आहे.तसंच आईलाही लेकराला डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देण्याची इच्छा आहे. पण हे वर्ष लेकराला आईपासून दूर ठेवणारच आहे आणि आईलाही लेकरा पासून, परंतु वारकरी सांप्रदायाची आई सर्वज्ञ आहे, विश्वमाऊली आहे ती, सर्वांचे हृदय जाणणारी आहे.

आपण आहोत त्या गावावरून जरी आईला आवाज दिला तरी तो आई पर्यंत पोहोचेल . कारण आईला संकटात असलेल्या लेकरांचा आवाज कळतो. पण तो तेवढ्या हृदयातल्या आर्ततेचा पाहिजे. आणि तेवढी आर्तता आपल्या हृदयात असेल तर आपण संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीमध्येच आहोत यात काही शंका नाही. शेवटी प्रश्न उरतो तो भावनेचाच.

लेखक – ह.भ.प.  नारायण महाराज शास्त्री (एम.ए. तत्वज्ञान)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.