जयपूर – जयपूरच्या वर्ल्ड ट्रेड पार्क मॉलच्या मालकाने चोरीच्या आरोपाखाली एका महिलेचे कपडे जबरदस्तीने काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने शोरूम मालक आणि कर्मचाऱ्याविरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:45 वाजता मॉलमधील एका शोरूममध्ये कपडे खरेदीसाठी गेली होती. ही महिला शोरूमच्या चेंजिंग रुममध्ये काही ड्रेस ट्राय करण्यासाठी गेली. यावेळी तिला ड्रेस फिट होत नसल्यामुळे महिलेने सेल्समनकडून तिच्या आकाराचे कपडे मागितले.
यानंतर या महिलेने तिला फिट होणारा ड्रेस घेतला आणि हा ड्रेस घेऊन ती बिलिंगसाठी कॅश काउंटरवर गेली. त्याच वेळी, सेल्समनने महिलेवर आरोप केला की चेंजिंग रुममधून बाहेर येतांना तिने ड्रेसची चोरी केली आहे. यावर महिलेने आपली बाजू मांडत शोरूमच्या कर्मचाऱ्याला तिची बॅग दाखवली आणि तिचे सामान तपासण्यास सांगितले. पीडितेच्या बॅगेत काहीही न मिळाल्याने सेल्समनने शोरूमच्या इतर कर्मचाऱ्यांना आणि गार्डला बोलावले.
महिलेने हा सर्व प्रकार शोरूम मॅनेजरला सांगितला मात्र त्यांनी तिचे ऐकले नाही आणि महिला गार्डला बोलावून कपडे काढून झडती घेण्यास सांगितले. महिला गार्डने सर्वांसमोर महिलेला चेंजिंग रूममध्ये नेले आणि शोरूम मालक आणि व्यवस्थापकाच्या सांगण्यावरून पीडितेचे सर्व कपडे काढून झडती घेतली गेली. तपासणीत काहीही आढळले नाही. मात्र यावरून या महिलेचा संताप वाढला तिने थेट पोलिसात याबाबत तक्रार केली आहे.