मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज मुंबईत दाखल झाले आहेत. याप्रसंगी मुंबई विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी स्वागत करण्यात आले. ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर ढोल-ताशाच्या गर्जरही करण्यात आला.
या स्वागतावेळी शिवसैनिकांसह शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू आणि खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. योद्धा नावांच्या फलकांसह राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. संजय राऊतांच्या फोटोसह पोस्टरबाजी करताना शिवसैनिक दिसून आले. विमानतळ ते भांडुप रॅली काढून शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीतून संजय राऊत मुंबईत दाखल झाले. त्यावेळी माध्यमांसोबत पोलीस आणि कार्यकर्ते यांची लगबग पाहायला मिळाली.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संजय राऊतांच्या मुंबईतील दादर येथील फ्लॅटवर ईडीने कारवाई केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईवेळी संजय राऊत दिल्लीत होते. मात्र, आज ते मुंबईत दाखल झाले असून किरीट सोमय्या यांची तक्रार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत.
ही गर्दी जमवण्यात आली
ही शिवसैनिकांची गर्दी जमली नाही, तर ही गर्दी जमवण्यात आली आहे. अशा प्रकारे शिवसनेच्या नेत्यावर कारवाई झाल्यानंतर भविष्यात अशा आणखी कारवाई होणार की काय, यातूनच आक्रमक पवित्र घेत हे शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. मात्र शक्तिप्रदर्शन करून काही होत नाही, असा टोला विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगाविला.