Sanjay Raut : राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्ज प्रकाणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यातच शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तीव्र शब्दात हल्लाबोल केला आहे. याविषयी बोलताना राऊत यांनी, “देवेंद्र फडणवीस फार भरकटल्यासारखं बोलत आहेत. त्यांची थोडी मती गुंग झाली,” असा आरोप संजय राऊतांनी केला.
आज सकाळी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. यावेळी बोलताना,“देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठं नेक्सस उघड होणार आहे. मात्र, नेक्सस उघड झालं आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. तेही फार भरकटल्यासारखं बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना त्याच्या वासाने नशा येत असेल. त्यांच्या आसपासची माणसं नशेच्या बाजारात फिरतात. त्या नशेबाजांमुळे फडणवीसांची थोडी मती गुंग झाली आहे.”असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलतां त्यांनी, “कसलं नेक्सस उघड होणार आहे? देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्यात एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि फडणवीस राजकारण करत आहेत. फडणवीसांच्या नागपूरमधील सरकारी बंगल्यावर एका पोलीस उपायुक्तावर भाजपा कार्यकर्त्याकडून हल्ला झाला. फडणवीस काय करत आहेत?”, असा सवाल संजय (Sanjay Raut)राऊतांनी विचारला.
त्यासोबतच, “डीसीपीची कॉलर पकडण्यात आली. काय हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. बाळासाहेब देसाईंसारखा गृहमंत्री लाभलेल्या महाराष्ट्राला असा गृहमंत्री लाभणं दुर्दैव आहे. या महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले आहेत. त्यांनी राजकारणापलिकडे जाऊन राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळली. त्यांनी सुडाने कधीही कारवाया केल्या नाहीत,” असेही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी म्हटले.