मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीची अधिकृतपणे युती झालेली आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही युती जाहीर केली आहे. शिवसेना (ठाकरे गट) हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष आणि आमच्याबरोबर वंचितची युती आहे. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीसोबत लोकसभेच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकत्र बसून चर्चा झाली असून त्यात काही निर्णयही झालेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
आम्ही समविचारी पक्ष आंबेडकरांना घेऊन पुढे जाणार आहे. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर लढतात आणि त्यांनीच ती लढावी याबाबत महाविकास आघाडीत एकमत आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठिशी आहोत. यासोबत कोणत्या जागेवर वंचितचे उमेदवार जाहीर करता येतील याच्यावरील चर्चा जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आली आहे, असे राऊत म्हणाले.
दक्षिण मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद नाही. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत गेल्या दोन टर्मपासून या जागेचे प्रतिनिधित्व करतात. गेले 10 वर्ष शिवसेना ती जागा जिंकत आहे. जसे भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचे आहे. तसे काँग्रेसचे हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे सगळे दिल्लीत एकत्र बसू आणि निर्णय घेऊ. काँग्रेसच्या नेत्यांना एकेका जागेसाठी दिल्लीत जायला लागू नये म्हणून आम्ही त्यांची ही सोय पहात आहोत, असेही राऊत म्हणाले.