मुंबई – महाराष्ट्रात मादक द्रव्यांचा व्यापार वाढत असून या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या तारा जुळल्या आहेत काय असा थेट सवाल करीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाच घेरण्याचा प्रयत्न केला आहे. नोएडा येथील रेव्ह पार्टीत (Rave Party) सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी एल्विश यादव याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वागत केल्याच्या घटनेकडे बोट दाखवत राऊत यांनी हा आरोप केला आहे.
“रेव्ह पार्ट्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सापाच्या विषाची विक्री करणारा या देशातील सर्वात मोठा ड्रग माफिया एल्विश यादव (drug mafiya Elvis Yadav) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आला. त्याचे स्वागत करून त्याच्या हस्ते तेथे गणपतीची आरती करण्यात आली असे सांगून राऊत यांनी म्हटले आहे की, तुमच्या निवासस्थानी कोण येते याची माहिती घेण्याची बुद्धी मुख्यमंत्र्यांना नाही का? देशाला हे जाणून घ्यायचे आहे कारण हे ड्रग प्रकरण देशाशी संबंधित आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
एल्विश यादव (Elvis Yadav) आणि इतर सेलिब्रिटींनी 24 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी उत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. सध्या एल्विश यादव नोएडा पोलिसांच्या ताब्यात असून त्याला 14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या ताब्यातून पाच कोब्रा, एक अजगर, दोन दुहेरी डोके असलेले साप यासह एकूण नऊ साप जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून विषही जप्त केले आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी या प्रकरणात यूट्यूबर एल्विश यादवच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. त्यावरून संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केला आहे.