मुंबई : पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राज्यातील राजकारणात एकच गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान आरोपांवर संजय राठोड हे चक्क १५ दिवसांनी सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवी परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या शक्तीप्रदर्शनावरून भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘वन मंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत नसून हे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हानच आहे. कोरोना नियमांची पायमल्ली करून ते एक प्रकारे आव्हान प्रदर्शनच करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून करोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत. त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातली नसून केराची टोपली दाखवल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले.
राठोड यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शना दरम्यान राज्यावर घोंघावणाऱ्या करोना संकटाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले. इतकंच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनालाही संजय राठोड आणि समर्थकांनी पायदळी तुडवत पोहरादेवी परिसरातील प्रचंड गर्दी केली होती.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले होते.