#Crime : पंधरा वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात दोघांची सुटका

प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आणि एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर सुटका

पुणे – सुमारे पंधरा वर्षांपूर्वी घटस्फोट देत नसल्याच्या कारणावरून सुरीने मारहाण करणाऱ्या दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि एक वर्षाच्या चांगल्या वर्तुणूकीच्या हमीवर सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी दिला. दंडाची रक्कम फिर्यादीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

श्रावण दिवेकर, अरविंद साळवे अशी त्यांची नावे आहेत. 29 जुलै 2006 रोजी रात्री अकराच्या सुमारास येरवडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली.

30 वर्षीय फिर्यादी हे येथील राज चौकात उभे होते. यावेळी, श्रावण व अरविंद यांनी चारचाकीतून येत तुझ्या भावाला फार मस्ती आली आहे. तो घटस्फोट का देत नाही असे म्हणून श्रावण याने फिर्यादीवर धारदार हत्याराने वार केले तर दुसऱ्याने लाकडी दांडक्‍याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 323, 324, 506 सह 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.