मुंबई: बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याने राष्ट्रीय समाज पक्षात (रासप) प्रवेश करणार असल्याचा स्पष्ट इन्कार केला आहे. संजयच्या संभाव्य प्रवेशाबाबतचा दावा रासपचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री महादेव जानकर यांनी रविवारी केला होता. मात्र, त्या दाव्यावर संजयने एकप्रकारे फुली मारली आहे.
संजय पुढील महिन्यात रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जानकर यांनी म्हटले. त्यांचा दावा चर्चेचा विषय ठरला. त्यावर संजयने सोमवारी स्पष्टीकरण देणारे निवेदन जारी केले. कुठल्याच राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही. जानकर हे माझे मित्र आहेत. ते मला भावासारखे आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो, असे संजयने म्हटले. रासपच्या विस्तारासाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बरोबर घेण्याच्या रणनीतीचे सूतोवाच जानकर यांनी केले होते.
मात्र, संजयच्या स्पष्टीकरणाने त्या रणनीतीला सुरूवातीलाच धक्का बसल्याचे मानले जात आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दत्त कुटूंबाचा सदस्य असणाऱ्या संजयने याआधी राजकारणात उडी घेतली होती. त्याला 2009 मधील लोकसभा निवडणुकीवेळी समाजवादी पक्षाने (सप) उत्तरप्रदेशच्या लखनौ मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत संजयला दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे संजयला उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्यानंतर सपने त्याला पक्षाचे सरचिटणीस केले. मात्र, संजय पदाचा राजीनामा देत सपमधून बाहेर पडला.