तीनच महिन्यांत गायीच्या किंमतीत दुप्पट वाढ
विशाल करंडे
लाखणगाव- मागील वर्षी दुधाचे घसरलेले बाजारभाव आणि त्यानंतर पाणी आणि चारा टंचाई दुग्धव्यवसायाला मारक ठरली. अनेकांचे दुग्ध व्यवसाय बंद होऊन आर्थिक स्थिती विस्कटली होती. शहरी भागात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये मंदीचे सावट निर्माण झाले आहे. सद्यस्थितीत दुधाच्या बाजारभावात वाढ झाल्याने तरुण शेतकरीही पुन्हा नोकरीऐवजी दूध व्यवसाय करु लागला आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सध्या दूध दरवाढ झाली असून गायीच्या दुधाला एका लिटरसाठी 28 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी दूध व्यवसायाकडे वळू लागला आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना करावा लागला होता. याला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी गायी विकल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांकडे गायीची संख्या कमी असल्याने शेतकरीवर्ग गाय खरेदी करू लागले आहेत.
सर्वत्र उपलब्ध झालेला चारा आणि दूध दरवाढ यामुळे जर्शी गायीच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी 15 ते 20 लिटर दूध देणारी गाय तीस ते चाळीस हजार रुपये किंमतीला मिळत होती. तीच गाय आज सत्तर ते ऐंशी हजार रुपयांना मिळत आहे. तीनच महिन्यांत गायीच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. यावर्षी उन्हाळ्यात सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. शेतकऱ्यांनी चारा आणि पाण्याच्या कमतरतेमुळे जर्शी गाय मिळेल त्या भावात विकल्या, परंतु सध्या सर्वत्रच चांगला पाऊस झाल्याने पाणी आणि हिरवा चाराही उपलब्ध झाला आहे. पावसाच्या पाण्यावर पुढेही चारा उपलब्ध होणार असल्याने शेतकरीवर्ग पुन्हा दुग्ध व्यवसायाकडे वळला आहे.
सध्या दुधाला बाजारभाव चांगले असून 28 रुपये प्रति लिटर दर शेतकऱ्यांना मिळत आहे. पुढील काळात दुधाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरीवर्ग दूध व्यवसायाकडे वळाला आहे. दुधाचे बाजारभाव वाढल्याने जर्शी गायीच्या किंमतीतही वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. डिंभे (हुतात्मा बाबू गेणू सागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे. धरणातील पाण्यावर अवलंबून असणारे परिसरातील शेतकरी वर्ग पुन्हा एकदा दूध व्यवसायाकडे वळला आहे.