पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलातील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. गेली 22 वर्षापासून ही अकादमी सुरू आहे. त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी सुमारे 4 कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या 80 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे. या नव्या बदलामुळे संगीत अकादमी कात टाकणार आहे.
शहरात सांस्कृतिक चळवळ निर्माण व्हावी. तसेच नागरिकांचा सहभाग वाढविणे ही संकल्पना रुजविण्यासाठी कला, संगीत अकादमीचे कामकाज विस्तारण्याची गरज निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड संगीत अकादमीची स्थापना 8 जून 2001 रोजी झाली. शहरातील विद्यार्थ्यांना प्रगत संगीत विषयक शिक्षणाचे धडे मिळावे व शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात भर पडावी या उद्देशाने अकादमी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी शहरातील विद्यार्थी आणि नागरिकांना संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पुणे शहर गाठवे लागत होते. संगीत अकादमीत नाममात्र शुल्कामध्ये शिक्षण दिले जात आहे. शासनमान्य परीक्षांची संपूर्ण तयारी देखील येथे करून घेतली जाते. शिक्षणासोबत मासिक संगीत सभा, चर्चासत्र, वासंतिक शिक्षण शिबिर, कला स्पर्धा यासारखे अनेक सांगितिक उपक्रम अकादमीत राबवले जातात.
महापालिकेच्या निगडी आणि चिंचवड, संभाजीनगर येथे दोन छोटे संगीत अकादमीचे विभाग चालविले जात आहेत. या संगीत अकादमीमध्ये शास्त्रीय गायन, सुगम संगीत, तबलावादन, हार्मोनियम वादन आदी विषय शिकविले जातात.
हे बदल होणार
संगीत अकादमीमध्ये साऊड प्रूफ काच असलेल्या सभागृहाची निर्मिती. एसीची सुविधा असलेले स्टेज. सर्व संगीत वर्गामध्ये स्टेज व आसन व्यवस्था आणि रंगरंगोटी करण्यात येणार आहे. गळके छत दुरुस्त करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यावर अकादमी असल्याने लिफ्टची सोय करण्यात येणार आहे.
संगीत अकादमीच्या देखभाल दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर महिना अखेरीपर्यंत लिफ्टसह पूर्ण काम करण्यात येणार आहे. सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी आला आहे.
– मनोज सेठिया, सह शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.