संगमनेरच्या प्रदूषणामुळे प्रवरेचे पावित्र्य हरपले

अमोल मतकर
दहाव्याच्या कार्यक्रमाचे उरलेले खरकटे, पत्रावळी नदीपात्रात

संगमनेर  – संगमनेर शहर जवळून वाहणाऱ्या प्रवरा नदीची आज अवस्था गटार गंगेसारखी झाली आहे. नदीकाठी होणाऱ्या दहाव्याच्या कार्यक्रमातील उरलेले खरकटे, पत्रावळी व अन्य साहित्य नदीपात्रात टाकल्याने पर्यावरणाची हानी होत आहे. त्यात प्रवरा नदीपात्राची वाळूतस्करांनी अक्षरशः वाट लावली आहे. त्यामुळे प्रवरा नदीचे पावित्र्यच हरपले आहे.

संगमनेरमध्ये काही पर्यावरणवाद्यांनी नदीपात्रात होणाऱ्या वाळू तस्करीबाबत सामाजिक माध्यमांद्वारे संबधितांचे लक्षही वेधले, मात्र त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने ते हतबल झाले. पर्यावरण आणि नागरी आरोग्याविषयी संगमनेर नगरपालिका फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे यावरून स्पष्ट होते.

पावसाळ्यात प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन्ही नद्यांना महापूर आले होते. त्यामुळे या दोन्ही नद्या नैसर्गिक दृष्ट्‌या स्वच्छ झाल्या. त्यानंतर त्यांचे पात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता पुन्हा या नद्यांनी गटारीचे रूप धारण केले आहे. संगमघाट आणि केशवतीर्थ येथे होणाऱ्या बहुतेक दहाव्याच्या कार्यक्रमातील टाकावू गोष्टीही सरसकट पात्रात फेकल्या जातात.

पुलाच्या खालच्या भागात छोट्या कत्तलखान्यातील अनावश्‍यक भाग, रक्त, पालिकेची सांडपाणी थेट नदीपात्रातच सोडण्यात आली आहे. त्यामुळे प्राचीन महत्त्व असलेली आणि शहराला नाव देणारी अमृतवाहिनी आज मात्र गटारगंगा बनली आहे. परिणामी पाण्याचा दुर्गंधीयुक्त घाण वास येऊ लागला आहे. यामुळे जलाशयातील पाणी दुषित होऊन मानवी जीवनास अतिशय धोकादायक व अपायकारक आहे.

संगमनेर नगरपालिकेने सार्वजनिक गटारींचे सांडपाणी थेट नदीपात्रात चारी खोदून सोडल्यामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यातच संगमनेरमध्ये बेसुमार वाळूउपसा सुरु असल्याने जागोजागी खड्डे झालेले आहेत.

या गटारीचे पाणी त्या खड्ड्यामध्ये साचून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्या बरोबरच विविध जीवजंतूंचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आलेले आहे. त्यातच शहरातील काही बड्या हॉटेल्स मधील उरलेले खरकटे, परवानगी असलेल्या प्राण्यांच्या कत्तलीतून राहिलेल्या टाकाऊ गोष्टी तसेच शहरातील विविध मंगल कार्यालयाच्या सोहळ्यातून शिल्लक राहिलेले अन्न नदी पात्राच्या आसपास फेकले जात असल्याने त्याठिकाणी डुकरे, मोकाट कुत्रे आणि अन्य जनावरे गर्दी करत असल्याने रिंग रोडवर अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे.

संगमाजवळ दहव्याचे कार्यक्रम होत असल्याने त्यात उरलेले खरकटे नदीपात्रा भोवतीच टाकले जात असल्याने येथील नदीपात्र प्रचंड प्रदूषित बनले आहे. आजवर पालिकेने अनेक वेळा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबविण्याबाबत सांगितले आहे. मात्र प्रत्यक्षात पालिकेकडून याबाबत कुठलीही तसबीज अथवा कारवाई केली नसल्याने दिवसेंदिवस नदीपात्रातील प्रदूषण वाढतच आहे. यावर वेळीच उपाय योजला नाही तर संगमनेरच्या पवित्र नदीपात्राचा मोठा नाला होणार असल्याची शक्‍यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे.

सांडपाण्यावर प्रक्रिया कधी होणार
संगमनेर खुर्दच्या नागरिकांनी कचरा डेपोबाबत वारंवार आंदोलने केल्याने व हरित लवादाकडे तक्रार केल्याने अखेर नगरपालिकेने कंपोष्ट खताचा प्रकल्प उभा केला आहे. तशाच प्रकारचा प्रकल्प जर संगमनेरातील सांडपाण्यावर प्रक्रिया केली तर त्यातून नगरपालिकेच्या जवळपास तीस बगीच्यांसाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.