आमदार संजय जगताप यांचा दावा
पुणे – “मी मंत्रिपद मागितले म्हणून थोपटे यांचे मंत्रिपद गेले; असा आरोप कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. मी कोणाकडेही मंत्रिपदाची मागणी केली नाही. शहर आणि जिल्हा कॉंग्रेसकडून मंत्रिपदासाठी केवळ आमदार संग्राम थोपटे यांचीच शिफारस करण्यात आली होती,’ असा दावा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. “पुणे जिल्ह्याला पक्षाकडून एखादे मंत्रिपद किंवा महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे, यासाठी आम्ही आजही आग्रही आहोत,’ असे जगताप यावेळी स्पष्ट केले.
कॉंग्रेस भवन येथे जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या बैठकीला उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, खजिनदार महेश ढमढेरे, प्रदेश प्रतिनिधी कौस्तुभ गुजर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. “कॉंग्रेस भवनची तोडफोड झाल्यानंतर आम्ही रीतसर पोलिसांत तक्रार केली आहे. तोडफोड करणारे कार्यकर्ते कोणाचे होते, कोणत्या तालुक्यातील होते, हे पोलीस तपासातून पुढे येईल. या सर्व घटनेचा अहवाल प्रदेश कॉंग्रेसकडे पाठवला आहे.
संबंधितांवर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील. विश्वजीत कदम यांच्या मंत्रिपदाची शिफारस केल्याचा होत असलेला आरोपही चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. कोणी कोणाची शिफारस करण्याची पद्धत कॉंग्रेसमध्ये नाही. ज्याला मंत्रीपद द्यायचे आहे, त्यांचा बायोडाटा पक्षाकडून मिळवला जातो. त्यानंतरच वरिष्ठ पातळीवर होतो,’ असे जगताप म्हणाले.
इंदापूर कॉंग्रेस कार्यालयासाठी कायदेशीर लढाई
इंदापूर येथे तालुका कॉंग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या कार्यालयावर इतरांनी ताबा मिळवला आहे. फेरफार करून हे कार्यालय 2015 साली एका ट्रस्टच्या नावावर करण्यात आले आहे. कार्यालयाचा ताबा पुन्हा तालुका कॉंग्रेस कमिटीला मिळावा, यासाठी आम्ही लवकरच कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही जगताप यांनी यावेळी सांगितले.